Skip to main content

मराठी ओळी

ही वाट उगाचच भरकटलेली,
पायात घुटमळताना ह्रदयात शिरलेली.
ही वाट अशी चुकलेली,
नात्यांना अर्थ सांगणारी!
-गोसाव्यांचा योगेश
२ सप्टेंबर, २०११

चांद आज हा मातला असे या नभात,
चांदण्यांचा सडा मग पडे आज अंगणात.
काजळीने फेसाळलेला अंधार या नभात,
रात्रीचा हा खेळ बघू, चल बसू अंगणात!
-योगेश गोसावी
१३ डिसेंबर, २०१६

आठवणींचा झोका नेहमीच असं करतो,
जवळ आलाय असं वाटत असतानाच मागे फिरतो.
-योगेश गोसावी
१५ डिसेंबर, २०१६

मावळतीला बघा मित्र हा कसा असे चालला!
भेटून येतो मी निशेला गुज सांगून मला चालला!
-योगेश गोसावी
३ जानेवारी, २०१९

दररोज येणारा तो आज काहीसा मिश्किल वाटला!
धुक्याची तिची चादर लपेटून उगाच थोडा हळवा भासला!
-योगेश गोसावी
९ जानेवारी, २०२०

देव आणि दानव वेगळे आहेत थोडेच,
भांडत ठेवून आपल्याला करतात मंथन सारेच!
-योगेश गोसावी
१० फेब्रुवारी, २०२०

ग्रीष्माचा तडाखा सहनच करावा लागतो,
लागलीच सावली तर मग कोणाचा तरी आसराच घ्यावा लागतो!
म्हणूनच मी नेहमी झाड होऊ पाहतो,
तडाखा सोसून का होईना थोडा थंडावा देऊ पाहतो!
-योगेश गोसावी
२३ एप्रिल, २०२०

झाड गुलमोहोराचं, ग्रीष्मात पण बहरलेलं.
मन माझं आसुसलेलं, वळवाच्या आठवणीनं मोहोरलेलं.
-योगेश गोसावी
२२ मे, २०२०

स्वप्न पाहावीत की बोलावीत,
काही कळेनासं झालयं!
वर्तमान जगावा की भविष्य पाहावं,
काही उमगेनास झालयं!
-योगेश गोसावी
२५ मे, २०२०

आठवण नाही काढलीत तर कोणी काढणारही नाही.
एकदा क्षितजापार गेला की सूर्याची कोणाला गरजही भासत नाही.
उद्या उगवला नाहीत तरी काही फरक पडणार नाही!
उगवतीला दुसऱ्याला आणून बसवायलाही वेळ लागत नाही!

आपणच आपल्या आकाशात मस्त फिरत राहावं,
दुसऱ्याला प्रकाश देताय की अंधारात जाताय
-योगेश गोसावी
१७ जून, २०२०

गंध नव्हे नुसताच हा, सुगंध आहे हा असा.
रात्रीस माझ्या फुलवणारा परिस गवसला पाहा!
-योगेश गोसावी
२३ जून, २०२०

नको नको रे माऊली, हर हाकेला तू धावूस.
थोडे तरी बळ आम्हां आता दाखवू दे!
हाक ऐकता जीवानिशी, नको काही पाहुस.
माऊलीच्या हक्काने हात लेकरा या दे!
-योगेश गोसावी
२८ जून, २०२०

तुझ्याच अंगाखांद्यावर खेळलो,
तुझ्याच कुशीत हसत निजलो.
तूच दिले सवंगडी जे अभिमानाने मिरवतो!
तूच माझी शाळा म्हणून अजूनही हेलावतो!
-योगेश गोसावी
३० जून, २०२०

छंद लागो मजला तुझा रे पांडुरंग!
दुसरे न काही लागो बस एक तुझा अभंग!
-योगेश गोसावी
१ जुलै, २०२०

कोणी म्हणतं नाग, तर कोणी म्हणतं बैल!
नवऱ्यासाठी सगळ्या प्राण्यांची नाव हे घेतील!
अरे सांगा रे यांना कोणीतरी समजावून,
जशी तू होशील तसा मी बनून येईन!
-योगेश गोसावी
२५ जुलै, २०२०

घेतो हलकेच मिटून मी स्वतःला
जेंव्हा येशी तू मला दुखवाया.
उमलेलं मी पुन्हा अलवार,
जेंव्हा तू मिटशील माझ्यात!
आहे असाच राग तुझा ना ताब्यात,
पुन्हां अलवार लागेल मला उघडाया!
-योगेश गोसावी
१७ ऑगस्ट, २०२०

आला क्षण निरोपाचा,
सोबत घालवलेले सुखाचे क्षण आठवण्याचा!
पुन्हां एकवार भेटण्यास यावे परतुनी,
तोपर्यंत करू या क्षणांची उजळणी!
-योगेश गोसावी
२८ ऑगस्ट, २०२०

मंगलमय करुनी आसमंत सारा,
निघाले बाप्पा अन कोसळती या धारा!
मोहातुनी मोक्ष मिळावा हीच तुज कडे प्रार्थना,
अन प्रत्यक्ष तुझाच मोह व्हावा हीच आमची धारणा!
-योगेश गोसावी
२८ ऑगस्ट, २०२०

दार पाठीमागचं, बाहेरच्या कोलाहलातून अलगद बाहेर काढणारं.
कोणतंही गुपित हळूच आत घेणारं!
दुर्लक्षिले जाते कित्येकदा नकळत!
आणि तरीही आपसूक वाचविते, ते ही नकळत!
-योगेश गोसावी
९ सप्टेंबर, २०२०

दिशेस पश्चिमेला उधळीत रंग,
निशा येते उलगडीत आपुले अंतरंग.
-योगेश गोसावी
९ सप्टेंबर, २०२०

आश्वस्त करुनी निघाला मित्र पैलतीरावर,
फिरुनी पुन्हां भेटण्यासाठी ऐलतीरावर!
-योगेश गोसावी
१ ऑक्टोबर, २०२०

पाऊस शेवटचा, नेहमी अचानकच येतो.
कोरड्या झालेल्या मनाला पुन्हा एकदा भिजवतो!
त्याला कंटाळलेलो आपण, आता मात्र सुखावतो.
परत भेट पुढच्याच वर्षी, म्हणून आपणही ओलावतो!
-योगेश गोसावी
१ ऑक्टोबर, २०२०

गंध फुलांचा गुज मला सांगून गेला,
येऊन गेलीस माझ्याही आधी, अंगणातील पारिजात हळूच बोलला!
-योगेश गोसावी,
२३ ऑक्टोबर, २०२०

पाऊलवाटेवर ओळखीच्या खुणा शोधत शोधत पाऊलवाट कधीच मागे पडलेली.
काहीच खुणा सापडणार नाहीत अशी काळी सडक आता लागलेली!
-योगेश गोसावी
२७ ऑक्टोबर, २०२०


शून्य तुझं मोठं की माझं, कसं आता ठरवायचं?
की दोहोंच्या नशीबी शून्यच, हे उमगून आता वाटेला लागायचं?
-योगेश गोसावी
१० डिसेंबर, २०२०

कर्ता करविता तूच, तुला मागू तरी कसे?
तुझ्या परीक्षांना सामोरे जाण्यास बळ दे जरासे!
अपेक्षा सगळ्यांच्या हिताची तूच मनी टाकलीस,
त्याच विश्वासावर आहे इथंपर्यंत मजल मारली!
-योगेश गोसावी
१ जानेवारी, २०२१

तळपतो तो गगनावरी, तेंव्हाच भेट आपूली या धरेवरी!
सावलीचं बोले मग सावलीला, चल जाऊ, अन भेटू आपण उन्हाला!
-योगेश गोसावी
१६ जानेवारी, २०२१

जळत असेल आसमंत तरी आपण बहरावं हे बहाव्या कडून शिकावं.
ग्रीष्माच्या तडाख्यात ही कुणासाठी तरी मंद झुळूक होऊन यावं!
-योगेश गोसावी
१७ मार्च, २०२१

पुन्हा सांजवेळी ढगांची ती गर्दी, मनी दाटल्या त्या राहिलेल्या भेटी.
पुन्हा तो एक चोरटा कवडसा, जणू तीच आशा पुन्हा भेटण्याची!
-योगेश गोसावी
१४ एप्रिल, २०२१

निखळले गंधाचे तारे, करुनी सुगंधित आसमंत सारे!
आयुष्य असावे इतुकेच पण दरवळ व्हावा चहूकडे!
-गोसाव्यांचा योगेश
२४ एप्रिल, २०२१

पुन्हा पाऊस पडतोय, तू नसताना.
मी मात्र कोरडा, चिंब भिजत असताना!
-गोसाव्यांचा योगेश
२४ एप्रिल, २०२१

संध्येचा समय आज गंधाळून गेला,
अंगणातील मोगरा जेंव्हा बहरू लागला.
-गोसाव्यांचा योगेश
३१ मे, २०२१

भक्तीचा टिळा कपाळी मिरवायचा नसतो,
तो आचरणातून दिसतो.
पंढरीचा माझा राया मग रस्तोरस्ती भेटतो.
-गोसाव्यांचा योगेश
१९ जुलै, २०२१

माझ्या रायाचे हो वैकुंठ कसे होईल हो रिते,
सर्व भक्तांची हो मने धावती चंद्रभागेकडे!
-गोसाव्यांचा योगेश
२० जुलै, २०२१

सावलीत माझ्या जेंव्हा सावळा मज दिसे,
राधाच नव्हे, यशोदा आणि सुदामा ही सभोवती भासे!
-गोसाव्यांचा योगेश
२६ ऑगस्ट, २०२१

मोगरा, माझ्या मनातला,
तू भोवती असताना दरवळणारा!
ऋतू असू दे कोणताही,
तुझ्यासवे फुलणारा!
-गोसाव्यांचा योगेश
२ डिसेंबर, २०२१

रणरणत्या उन्हात कोठून एक ढग येतो.
होरपळणाऱ्या मला जणू तुजसम कवेत घेतो.
-गोसाव्यांचा योगेश
८ जानेवारी, २०२२

परत त्यांना भेटेन अस का त्या चुकांना वाटतं कळतच नाही?
नवनवीन चुकांशी भेटायची माझी मस्ती त्यांना समजतच नाही!
-गोसाव्यांचा योगेश
१२ जानेवारी, २०२२

शारीर प्रेम व्यक्त करणारे दोन जीव,
एकमेकांच्या मानसिक प्रेमापर्यंत पोहोचेना!
घरदार सारे चिंताक्रांत,
सगळं असताना यांचा संसार का फुलेना?
-गोसाव्यांचा योगेश
२३ जानेवारी, २०२२

तेजगोल हे लुकलुकती अन सांगती गुज मला,
चेतवशील आत्मा तर उजळेल आसमंत नवा!
-गोसाव्यांचा योगेश
७ फेब्रुवारी, २०२२

परतीची वाट सुखावते तेंव्हा,
पाऊले चालतात घरची वाट जेंव्हा!
-गोसाव्यांचा योगेश
१८ एप्रिल, २०२२

मोगरा,
समोर दिसावा, अन् मनात फुलावा.
गंधाळलेला प्रत्येक श्वास, पहिलाच भासावा!

-गोसाव्यांचा योगेश
१८ एप्रिल, २०२२

पसारा आठवणींचा केंव्हाच आवरलाय,
नव्याने जमा करावयाचा निर्णय ही झालाय!
योगी, कितीदा नव्याने सांगायचं?
जुना काळ केंव्हाच बदललाय!
-गोसाव्यांचा योगेश
२ जून, २०२२

श्रावण, तुझा माझा
ऊन पावसाच्या खेळाचा.
संसार, तुझा माझा
हळव्या उत्कट क्षणांचा..
मुलं, तुझ्या माझ्यातले
हरवणार सापडणार.
प्रेम, तुझं माझं
नेहमीच बरसणार!

-गोसाव्यांचा योगेश
१ ऑगस्ट, २०२२

ज्ञाना तुझा, तुका ही तुझा,
लेकुरवाळा तू,
अजून आमच्या पासून दूर कसा?
शोधतो तुला अवतीभवती,
अजूनही दिसेना आरसा मला.
पाऊले आमची चालती संसाराची वाट,
वारीचा वसा घेऊनियां मना मनात!
-गोसाव्यांचा योगेश
१० जून, २०२३

मौनाचा आवाज तू, कल्लोळातील शांतता तू.
दुःखातील आनंद तू, आंनदातील समाधान तू.
माझ्यातील बाप्पा तू, बाप्पांचा बाप्पा तू.
प्रकट होता उद्या तू, होऊ दे अवघ्या मनाचे गुपीत तू!
-गोसाव्यांचा योगेश
१९ सप्टेंबर, २०२३

माणसाला माणूस म्हणून ठेवायला कोणीच तयार नाही.
चांगल्याला देव, वाईटाला राक्षस करायचीच सर्वांना घाई.
-गोसाव्यांचा योगेश
२९ नोव्हेंबर, २०२३

हळू हळू जळताना, सभोवताल सुगंधित करत होतो!
चंदन नव्हतोच मी कधी, सहवासात तिच्या कदाचित उजळलो होतो!
-गोसाव्यांचा योगेश
२३ डिसेंबर, २०२४

मान्यवरांमध्ये नव्हतोच मी कधी,
नेहमी इतरांमध्ये होतो मी!
प्रश्न जेंव्हा जेंव्हा मित्रांचा होता,
सर्वात पुढे होतो मी!
-गोसाव्यांचा योगेश
५ जून, २०२५

ग्रीष्मातल्या उन्हात पण कसं बहरून यावं, 
हे बहाव्या कडून शिकावं! 
आयुष्यातील उन्हाळा पण झळाळून काढणं आपल्याही नशिबात यावं!
-गोसाव्यांचा योगेश
१८ एप्रिल, २०२६

Comments

Popular posts from this blog

ऊंची इमारत

ऊंची इमारत बस एक ही इमारत पता है मुझे, जो शुरू होती है ऊपर से और नीचे जमीन पे खत्म होती है। बचपन की उड़ाने जैसे मेरी, आसमान से शुरू होकर अब जमीन पे आयी है। कुछ चाहते थी, कुछ सपने थे। आसमान का एक टुकड़ा मिल जाए ऐसे अरमान थे। बढ़ती उम्र ने, दुनिया की रीत ने, पटका है जमीन पे ऐसे, जैसे नींद में गिरे हो अपने ही सपने से। इमारत अब भी वही है, बस अब गुजारा नीचे ही होता है। बचपन का गुजरा बचपना अब ऊपर चढ़ने से रोकता है। -योगेश गोसावी १८ सितंबर, २०२१

पाऊस परतीचा

पाऊस निघाला आज पुन्हा परतुनी तुझ्या माझ्या सगळ्या चिंब आठवणी! घेवून का ग जाईल तो ते सारे हळवे क्षण? की ठेऊन जाईल ओथंबलेले मनातले पण? का कोण जाणे त्याचे जाणे अन् येणे वेडावत...

बॅक बेंचर्स

बॅक बेंचर्स अस किती दिवस चालायच, आम्ही किती अस झुरायच? तुझ्या एका नजरेसाठी आम्ही कितीदा मरायच? तू एकदा तरी बघशील म्हणून आम्ही प्रत्येक लेक्चर करायच, तू मात्र त्या काळ्या फळ्याकडे डोळे वासून बघायच! तुला आवडत नाही म्हणून आम्ही मागचे बेंच सोडायचे, आणि तू मात्र त्यांच्याच बरोबर चहाचे दुकान गाठायचे! आता नाही अस कधी होणार, कुणी नाही झूरणार की कुणी नाही मरणार, तुला सोडून प्रिये आता आम्ही खालच्या वर्गात जाणार! --योगेश गोसावी १७ जानेवारी २०१३