१९९२ व्या वर्षी "दिल हैं छोटासा" म्हणत त्याने आम्हां सर्वाना कधी "ये हसीं वादियां" पाहायला लावल्या कळलंच नाही. या मस्त सुरुवाती नंतर ९३ मध्ये मात्र आम्ही सगळे मोठं मोठयाने ओरडत संगत होता "प्यार कभी ना तोडेंगे".
हे सगळं सुरुच होत आणि त्यात भर टाकायला ९४ ला आली "उर्वशी", त्याने नकळतच नाचणाऱ्या आम्हां सर्वाना "सुन री सखी" म्हणत म्हणत हळुवार पण केले, आम्ही मात्र आमच्याच धुंदीत "मुक्काला मुकाबला" करत बाकीच्यांना सांगत होतो "प्रेमिका ने प्यार से". पण त्याने आमच्या इतर काही मित्रांचीही गरज ओळखली आणि घेऊन आला "पट्टी रैप" आणि म्हणायला मात्र लावलं "गोपाला गोपाला". ह्या अचानक इकडून तिकडून उड्या मारायला कसरत होत होती पण मजा हि येत होती.
९५ साली सुरुवात केली "थोडा थोडा प्यार हो गया" म्हणायला पण टीव्ही किंवा रेडिओ साथ द्यायला तयार नव्हता कदाचित .....चुकून कानावर यायचं. घरी टेपरेकॉर्डर नसण्याचा काळ होता तो! त्याच वर्षी आमच्या आवडीच्या सोनालीला घेऊन तिच्यासाठी आम्हाला म्हणायला लावलं "सुन ले ओ जानम"....ते मात्र कंटाळा येई पर्यंत म्हणालो. कारण विचारलं तर त्या गाण्यामध्ये असणारी मीनाक्षी आमच्या गावात एकही नव्हती. असती कोणी तर नक्कीच मार खाल्ला असता.
मार खाण्यावरून आठवलं, त्याच वर्षी मुंबई पुण्यात खूप धिंगाणा झाला! आम्ही "तू हि रे" म्हणायला आसुसलो होतो आणि तो मात्र "कहना ही क्या" म्हणत होता. म्हणेनाका, आम्हाला काय, आम्ही मात्र "एक हो गए हम और तुम" फुल्ल आवाजात म्हणत होतो आणि त्याहून उच्च स्वरात आमचे वडील आवाज कमी करायला सांगण्यासाठी आमचा जन्मच वाया गेला हे सांगत होते. ते त्यांच्या मित्रांना बोलताना ऐकलं होत मी.....उगाच हा टेप आणला रे घरी. आणि आम्ही मात्र वडिलांच्या ह्या उपकारातून कधीच मुक्त होणार नाही या आविर्भावात त्यांची सगळी काम चोख ऐकत होतो (आवाज कमी करायचं सोडून बरं!)
असं वाटत होत ९५ चे काम झालं आणि पुन्हा आम्ही धुंद व्हायला तयार.।कारण म्हणे "तनहा तनहा यहाँ पे जीना, ये कोई बात है...." बास आपल्याला अजून काय हवं होत तेंव्हा! आशा नावाचा जादुई स्वर, तो आणि आदल्या रात्री "मासूम" वाटणारी उर्मिला अचानक "हाय रामा" म्हणत समोर आली. बिचारे, बापडे आम्ही "क्या करे क्या ना करे" म्हणत म्हणत मित्रांना सांगू लागलो "यारों सुन लो जरा!"
ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ९६ साली "नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम" करत करत १०वीची परीक्षा कशी बशी पास झालो...कशी-बशी म्हणण्याचे कारण एवढच कि आजकाल ९०% पेक्षा जास्त मार्क सरकारी कृपेने घेणाऱ्या पिढीला ९०च्या काळातील ७०% पेक्षा जास्त मार्क काय चांगले वाटणार हो! असो, उगाच जादुई दुनियेतून व्यावहारिक जगात कशाला जायचे.
१०वी पास, कॉलेज मध्ये पाय ठेवायला आणि याने पुन्हा उर्मिला समोर आणून तिला "टेलिफोन धून" मध्ये हसायला लावलं आणि आम्ही पुन्हा तिच्या कि त्याच्या "लटका"मध्ये अडकलो. नशीब आमचं "हॅलो डॉक्टर" म्हणत त्याच वर्षी आम्हा सर्वाना "मुस्तफा मुस्तफा" म्हणत परत नाचायला लावलं. आधीच ११वी १२वी चे दिवस म्हणजे सगळे "आवारा भवरें", "चंदा रे, चंदा रे" म्हणत "एक बगिया" मध्ये हुंदडत होतो आणि तो मात्र आम्हांला आशा आणि येसूदासजीं सोबत "ओ भवरें" म्हणत उर्मिलाच्या तालात ताल धरायला लावत होता.
विचार करा १२वीचा! काय असणार होत नशिबात काही माहिती नव्हतं कारण ती तर एक "अजूबा" वाटत होती. एकदम "दिल से" अभ्यासाला लागलो. प्रत्येक विषय "ये अजनबी " म्हणत आम्हाला बोलावत होता आणि आम्ही "जियां जले" म्हणत म्हणत "छैया छैया" करत होतो. कसबस वेगवेगळ्या विषयांचे "सतरंगी रे" इंद्रधनू पेलू पाहत होतो. १२वीचे प्रत्येक सर अभ्यासाची "रुत आगयी रे" म्हणत होते. मन म्हणत होते कधी एकदाचे म्हणता येईल "मिल गयी मिल गयी वो मंझिले". गोष्टी अवघड करायला आमच्या काही मैत्रिणी म्हणत होत्या "मेरे दिल का वो शहजादा" तर काही म्हणत होत्या "तू ही तू मेरी सारी सुबहों में", काय करायचं होत आम्ही? वाटत होत काही का असेना १२वीत कोणता तरी "किस्सा हम लिखेंगे".
१९९९, महत्वाचे वर्ष! हा आला त्याचे महत्वाचे काम घेऊन, "इश्क बिना क्या जीना यारों" हे सांगत. त्याला म्हणालो अरे घरचे म्हणताहेत अभ्यास "करिये ना, करिये ना" आणि आम्हांला स्वतः "रमता जोगी" करून "कहीं आग लगे" झाल्यावर काय करू? आता एव्हढा महात्व्हाचा प्रश्न आणि वरून आम्हांला म्हणतो "नहीं सामने तू"...अरे ठीक आहे, नसू आम्ही दखल घेण्याजोगे, पण अस्तित्वच नाकारायचे म्हणजे जरा अतीच झालं. पण काही म्हणा पूर्वजांची पुण्याई वैगरे मी मनात नव्हतो पण त्या वर्षी त्यामुळेच कदाचित "सवर गयी सवर गयी" म्हणत आमची किस्मत आम्हाला १२वीच्या पार घेऊन गेली बरं. बेफाम होत मग आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजात सांगून टाकलं "ये नाजनी सुनो ना" "इम्तेहान हम प्यार का देंगे"....पण सगळ्यांनी आम्हाला "चाँद आया रे" म्हणत आकाश कडे पाहायला लावून स्वतः धूम ठोकली.
साल २००० आणि आम्ही इंजिनिअरिंग रुपी तक्षकाच्या जबड्यात असतानाही "रंग दे" म्हणत "तू फिजा हैं" असे गुणगान करत "आजा माहिया" चाललं होत. भरोसा स्वतःवर नाही पण पूर्वजांच्या पुण्याईवरच होता इथेही. २००१ साल म्हणजे पहिलच वर्ष, वाटत होत "मेहंदी है रचनेवाली" आणि अशातच पहिल्या वर्षीच्या निकालाने आम्हाला "ओ पालनहारे" म्हणायला लावलं. पण त्याची जादू अशी कि तशातही आम्ही "राधा कैसे ना जले" म्हणणाऱ्या राधेला "ओ री छोरी" म्हणत चुचकारत होतो. "सोना नहीं, ना सही" असे म्हणत स्वतःची समजूत काढत होतो आणि अशातच जाणीव झाली कि "खामोशियाँ गुनगुनाने लगी". पण नियतीला काही वेगळंच करायचं होत....आमच्यातला नायक जागा झाला आणि "चलो चले मितवा" म्हणू लागला. हा अवलिया कधी काय करेल हे माहिती नसल्याने आम्ही पुन्हा नव्या दुनियेत "चिनमा चिलकमा" करत विचारत फिरू लागलो "ये रिश्ता क्या कहलाता है"?
असं वाटत होत प्रेमाच्या दुनियेत प्रवेश होतच आहे आणि हा आला "देश मेरे देश मेरे" घेऊन. जरा कोठे देशभक्ती अवगत होत होती आणि २००२ साल उजाडले, "नैना मिलायके" म्हणत म्हणत आम्ही हि "चुपके से" प्रेमाच्या दुनियेत याच्या साक्षीने प्रवेश केला. इंजिनिअरिंग चे मार्क्स मात्र "छलका छलका रे" म्हणत होते पण आम्ही मात्र "साथिया" ला "ओ हमदम" करत गाडीवर फिरत होतो. त्या वर्षी निकाल आल्यावर मात्र प्रत्येक विषयाला यार म्हणून म्हणावेसे वाटत होते "मेरा यार मिला दे". त्यामुळेच कि काय २००३ मध्ये याला कमी ऐकलं आणि पुस्तकांना जास्त वाचलं.
२००४ उजाडलं आणि आम्ही "कभी नीम नीम, कभी शहद" म्हणत विवाह बंधनात "फन्ना" झालो ते हि याच्याच संगतीत. लग्न झालेलं, सोबत हुशार इंजिनिअर बायको, आम्ही नुसतेच (हुशार नव्हे) इंजिनीअर त्यामुळे स्वप्न हि मोठी...परदेशी जाण्याची! हा आला "यह जो देश है तेरा" करत आणि आम्ही कायमचे स्वदेशी झालो. नेहमी प्रमाणे पुर्वज्यांच्या पुण्याईने पास होण्याइतके मार्क मिळाले पण चांगली नोकरी काही मिळत नव्हती. "यूँ ही चला चल राही" करत मध्येच बायकोचे "सांवरियां" हि ऐकत दिवस चाललेच होते त्यातच हा २००६ साली "मस्ती की पाठशाला" मध्ये "खलबली" शी "रूबरू" होण्यासाठी याने आम्हाला झपाटले अक्षरशः.
२००८ साल आणि आम्ही दोनाचे तीन झालो! साहजिकच सगळीकडे प्रेम, माया अशा गोष्टींचा वर्षाव होत होता आणि याने त्यात कहर केला! एरव्ही आम्ही परकीय आक्रमकांच्या कोणत्याच गोष्टीला सहज चांगले न मानणारे याच्या "ख्वाजा मेरे ख्वाजा" मुळे त्यांच्या प्रेमातच पडतो कि काय असे वाटत होते! पडद्यावर वावरणारे याच्या जादूमुळे अजूनच छान वाटत होते. याचा "अज़ीम ओ शान शेनशाह" जेंव्हा "जश्न ए बहारा" म्हणत होता तेंव्हा खरोखर प्रेमळ भासला होता! ऐतिहासिक कालखंडातून त्याने सहज नंतर वर्तमानात आणले "पप्पू कांट डांस साला" म्हणत आणि त्याच वर्षी त्याने हे हि सांगितले "तू मुस्कुरा, जहाँ भी है तू मुस्कुरा". अहो खरचं, अजूनही हे ऐकलं कि मन हलकं होत. स्वतः वडील झाल्याचा आनंद अजूनही कमी झाला नव्हता आणि त्यामुळेच कि काय बायकोला "कैसे मुझे तुम मिला गयी" म्हणताना स्वतःच्या किस्मत वर यकीन होत नव्हता. म्हणूनच अजूनही तिची "गुजारिश" करत होतो त्याच्याच मदतीने.
पालकत्वामध्ये दिवस, महिने मस्त पटापट जात होते आणि या सगळ्यांमध्ये हि तो धुंद करायला म्हणावं तेंव्हा हजार असायचा. ९०च्या दशकात त्याने सुरुवात केली तेंव्हा रेडिओ आणि दूरदर्शन चा सहारा होता आणि त्या दशकाच्या शेवटी टेपरेकॉर्डर हि घरी आला होता. पण आता मात्र तो हवा तेंव्हा, हवा तसा ऐकायची सवलत होती. वाटलं होत सारखं सारखं ऐकून नकोस होऊन जाईल. घडलं मात्र वेगळच, अजूनच आवडायला लागला. त्याने केलेले वाद्यांचे प्रयोग, वेगवेगळ्या गायकांकडून केलेले वेगळे प्रयोग समजायला लागले असं वाटत असतानाच.....
साल २०११ आले! सोबत तो आला एकाच गायकाला भली मोठी संधी देऊन "फिर से उड़ चला" म्हणत. एकाहून एक "साड्डा हक्क" या "नादान परिंदे" "हवा हवा" करत मिळवले. "जो भी मैं कहना चाहु" म्हणत त्याने "शहर में" त्याच्या सारखा कोणीच नाही हे "कतियाँ करू" करत करत मान्य करायला लावल. २०१३ पर्यंत तर या "रांझना" ने "ए सखी" म्हणत "तुम तक" आणून पोहोचवलं हे पण कळलं नाही. २०१४ पर्यंत तर या अवलियाला "तू खुजा" म्हणत "कहाँ हूँ मैं" असं विचारावं वाटलं इतका भ्रमिष्ट होत होता याला समजून घ्यायला गेलो तर.
२०१५ मध्ये याचा "सफरनामा" "तू कोई और है" असं समजत समजत "तुम साथ हो" म्हणत म्हणत कायमचा हृदयात स्थानापन्न झालाय. माझ्या या "दिल बेचारा" ला या अतरंगी माणसाने "लिटल लिटल" "गरदा" करून टाकलय. असो, "रेत जरासी" असली म्हणून काय झालं आम्ही नेहमीच त्याचा "तेरे रंग" मध्ये रंगून जायला "चका चक" होऊन तयार असतो.
तर असा हा बहुतेंक जणांचा आवडता रहमान आज आपला स्वतःचा वाढदिवस साजरा करतोय. त्या निमित्ताने मी पण माझ्या आवडीच्या गाण्यांचा मागोवा घेत घेत इथे पोहोचलोय. एक साधारण संगीताची काहीच माहिती नसलेला मी, त्याच्या कित्येक अफलातून कलाकृतींना नाकारलं असेल किंवा दुर्लक्ष हि केलं असेल. पण आजही मला आवडलेली त्याची गाणी ऐकताना किशोर दा, मुकेश जी, रफी आणि इतर दुर्मिळ आणि एकाहून एक रत्न या कालखंडात नसल्याचे दुःख हा सहज खूप अंशी कमी करतो यात शंका नाही.
माझ्या ह्या लिहिण्याने तुम्हांलाही तुमची काही आवडती गाणी परत ऐकू वाटल्यास जरूर सांगा.
Wooow . काय सुंदर लिहिलय, माझा प्रत्येक दिवस आठवत गेला … खूपच अप्रतिम …
ReplyDeleteइतक अप्रतिम लिहिलसं अरे की अस वाटायला लागलं तु आता गाणी लिहिणार काही दिवसात...भयंकर आवडलं मला हे लिखान..वाचताना सगळी गाणी बॅकग्राऊंडला वाजत होती...हा नुसताच लेख नाही तर एक संगीतमय लेख आहे..मला खात्री आहे हा लेख जो कोणी वाचेल तो किंवा ती दिवसभर हि गाणी दिवसभर जमेल त्या प्रकारे गुणगूणनारचं...किमया असते शब्दात..नुसते वाचूनही कंठ फूटतो...
ReplyDelete