मतदार राजा (?)
ताई माई दादा आप्पा आबा तात्या म्हणत फिरत होता!
दिसायला साधाच, पण भविष्य आमचं त्याच्या हातात मागत होता!
दिसायचा अधे मधे कडक कपड्यात फिरताना,
आताशा रोज येतोय, दुसऱ्याच्या गाडीवर बसून हाल आमचे विचारायला!
नाव घेतोय सगळ्यांची, हात धरतोय प्रत्येकाचा
दोन घास खाऊन पोट भरलं म्हणतोय प्रत्येकाला!
सोपा आहे डाव त्याचा, खेळ खेळतोय भावनांचा
ठाव घेऊन मनाचा, धंदा करणार पुढच्या पाच वर्षांचा!
मतदार राजा, बाजूला टाकून शाळेत नागरिक शास्त्राला,
घोटला आहेस तू गळा स्वतःच्या भविष्याचा!
कळतंय का तुला, काय मागतो आहे तुझा नेता?
मत देऊन हुशारीने, होणार का रे तू खराखुरा राजा?
-गोसाव्यांचा योगेश
२१ ऑक्टोबर, २०२४
Comments
Post a Comment