वर्षपूर्ती
टीप -ज्या सगळ्यांनी या अवघड काळात जवळच्या कोणाला कायमचे गमावले, अपरिमित नुकसान सहन केले अशा सगळ्यांसाठी मनात दुःख आहेच! आपण सर्वांनाच हा काळ कठीण गेला आहे पण तरीही दुःख उगाळू नये असं म्हणतात. म्हणूनच या गोष्टी बाजूला ठेवून लिहिलेलं हे सर्व कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नव्हे तर हळव्या मनावर थोडी फुंकर घालण्याचा प्रयत्न समजावा!
काय म्हणता मंडळी, अहो वर्षपूर्ती होतेय! कशाची म्हणून काय विचारता?
घरात बसून राहायला लागतंय त्या काळाची नांदी होण्याची वर्षपूर्ती! बाहेरचं काहीही न खाता/पिता/पाहता राहण्याची सवय लागली त्याची वर्षपूर्ती.
क्रेडीटकार्ड नावाच्या फोफावत चाललेल्या प्लास्टिक पैशाच्या वापराला थोडा लगाम लागण्यास सुरुवात होण्याची वर्षपूर्ती!
एवढंच कशाला तर लग्न होऊन १-२ नव्हे तर अगदी ५० वर्ष झालेल्या जोड्यांनाही सलग इतके दिवस पहिल्यांदाच एकत्र राहण्याची, छे छे बांधून ठेवल्याची वर्षपूर्ती!
कधी नव्हे ते आपल्या स्वतःच्या गावाकडे ईतक्या दिवसांसाठी जायला मिळालेल्या दिवसांची वर्षपूर्ती!
शरीराच्या छोट्या मोठ्या कुरबुरी संपल्याची वर्षपूर्ती!
बऱ्याच घरांमध्ये पहिल्यांदाच सुरू झालेल्या स्वयंपाक घरातील प्रयोगांची वर्षपूर्ती!
स्वतःच स्वतःला नव्याने सापडल्याची वर्षपूर्ती!
ऑफिसमध्ये On Duty लागण्यास झाल्याची वर्षपूर्ती. १९ मार्च, २०२० पासून आमच्या ऑफिसमध्ये माझ्यासाठी घरून काम सुरू झालं!
पटतंय ना? खरचं निसर्ग जे काही करतो ते त्याचा संतुलन सांभाळण्याचा भाग असतो अस म्हणतात. मग आपण अस म्हणायचं का की हे वर्ष त्याचाच भाग आहे? याच एक असं उत्तर नाहीये आणि नसावचं. प्रत्येकाचा अनुभव वेगळा म्हणून उत्तरही वेगळ! सुरूवात झाली तेव्हा वाटलंही नव्हतं इतके दिवस लागतील. कितीदा वाटायचं थांबेल आता तरी, पण पुन्हा पुन्हा सुरुवात झाली. नकळत मग सर्वांनाच याचा सराव झाला. मग आता आहोत यामध्ये तर यातून मार्ग काय असं समजून प्रत्येकाने आपलं उत्तर शोधलं. कुणी जुने छंद जोपासले, कोणी नव्याने सुरुवात केली, कोणी स्वयंपाकगृहात स्वतःला अडकून घेतलं तर काहींनी टीव्हीसमोर आपल्या बस्तान मांडलं. सर्वात जास्त तर मजा झाली आहे जे आपल्या तरुणपणात आहेत त्यांची! काहींना नको असलेल्या नात्यामधून सुटका मिळाली तर काहींची आपोआप झाली. काहींना हव्या असलेल्या नात्यांमध्ये कायमची गुंतवणूक करता आली. काहींना स्वतःला जाणवलं चुकीच्या नात्यात अडकल्याची, काहींना नव्याने जाणीव झाली जुन्याच नात्यामध्ये असलेल्या अर्थाची! एका अर्थाने या पूर्ण वर्षांमध्ये निसर्गाने जवळजवळ सगळ्याच गोष्टींमध्ये आपले डोळे लख्ख उघडायला लावले.
माझ्या परिचितां मध्ये बऱ्याच जणांनी नोकरी गेली किंवा गेल्यास काय म्हणून नव्याने व्यवसाय निर्मिती केली. मागच्या वर्षाने आपल्याला बऱ्याच जणांना नव्या जाणिवा, नवे अनुभव आणि अशा नव्या नव्या गोष्टी उभ्या आणून टाकल्या. काहींनी त्या सहज स्वीकारल्या, काहींनी थोड्याशा अवघडल्या मनाने स्वीकारल्या पण एकंदरच सगळ्यांनी या नव्या गोष्टी स्वीकारल्या तर!
वर्ष पूर्ण होत आलं मग आता काय? पुन्हा पहिले पाढे गिरवायचे कि काही नव्याने लिहायचे? प्रत्येकाने स्वतःपुरते उत्तर नक्की शोधा! वर्षातून एकदा कधी दिवाळीनिमित्त तर कधी गणपती निमित्त, कधी नवरात्र तर कधी आणखी काही, एकदा तरी आपलं घर साफ सफाई साठी बाहेर पडतच. निसर्गाने पहिल्यांदा ही संधी आपल्याला दिली आहे स्वतःची साफसफाई करण्याची. शांत बसून एकदा विचार करा मागच्या वर्षी काय काय केले, काय नाही केले याचा. नको असलेल्या गोष्टी, हव्या असलेल्या गोष्टी तुमच्यासमोर आहेत. काय कमी करायच्या काय वाढवायचा त्या आपण ठरवू या. आपल्या आधी खूप कमी जणांना हे सौभाग्य लाभलं, स्वतःच्याच आयुष्याकडे असं तटस्थपणे पाहण्याचं. या सगळ्यांमधून पुन्हा एकदा राहिलेले आयुष्य नव्याने जगूयात, नव्याने एकत्र येऊयात!
मला विश्वास आहे आपणा सर्वांना हि नक्कीच जमेल. कारण निसर्गाने पुन्हा असे काहीतरी घेऊन येऊन मग आपले डोळे उघडण्या पेक्षा आपण स्वतःच आपले डोळे उघडूयात!
-तुमचाच,
गोसाव्यांचा योगेश
१९ मार्च, २०२१
Comments
Post a Comment