शुभेच्छा दिवाळीच्या!
यावेळीही गावाकडेच आलो आहे! नेहमी प्रमाणे गाडी काढली आणि बाहेर निघालो! खरतरं वाढणाऱ्या गाडीच्या वेगाबरोबर मन पुढं पुढं जायला हवं होतं पण ते मात्र भरभर भूतकाळात निघालं! रस्त्यावरून जाताना प्रत्येक वळणावरच्या खुणा, काही ओळखीची घरं (ज्यांच्याशी ओळख करायला त्या काळात हिंम्मत झाली नव्हती!😂) काही कट्टे, अशा सगळ्या गोष्टीं मला भूतकाळात घेऊन जात होत्या! वर्षभर हरवलेल्या या वाटा आणि खुणा नेहमी अशा सणांच्या दिवशीच भेटतात आणि त्रासयुक्त आनंद देतात! आज म्हटलं मस्त देवीचं दर्शन घ्यावे, लक्ष्मीपूजन आहे तर हा मुहूर्त साधावा! निघालो आणि काही क्षणात ११वी १२वीचं ज्युनिअर कॉलेज दिसलं.... ती खिडकी, ज्यातून डोकावून पाहत बाहेरच्या जगाचे आडाखे बांधत शिक्षण सुरू होत आणि त्या खिडकीच्या कडेचा माझा बाक जणू काही तोही माझाच भाग होता! त्याच्या सोबत राहूनच कित्येकदा कटाक्ष टाकले पण आणि कित्येक पकडले पण! 😜
खूप सारे मित्र आणि मैत्रिणी करण्याचा तो काळ पण माझे मात्र मोजकेच मित्र! ज्यांना माझ्या प्रत्येक कृतीची, आवडी निवडीची आणि इच्छेची खबर असायची! आनंदाची गोष्ट म्हणजे १-२ अपवाद वगळता सगळे अजूनही तितक्याच जवळ आहेत! गाव आणि या मित्रांची सोबत काही क्षणात परत सफर घडवून आणते त्या सळसळत्या वर्षांची! अशा वेळी कळतं नशा करण्यासाठी बाहेरील गोष्टींची गरजच नसते! गरज असते ती प्रत्येक क्षण उत्कटतेने जगण्याची आणि हे केलं की आपोआपच अशा आठवणी तयार होतात ज्यातून बाहेर पडायला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात!
नशीबवान असावं लागतं आपल्या आजूबाजूला अशी माणसं मिळायला जी बळ देतात तुम्हांला आणि तुमच्या उत्कटतेला! समजून घेतात तुमच्या भावनिकतेला आणि गरज पडल्यास सावरतात तुमच्या चुकणाऱ्या पावलाला! ही दिवाळी अशाच काही असंख्य आठवणी आणि जाणिवा घेऊन आली आहे या वर्षी आणि द्विगुणित करत आहे माझा आनंद!
आशा आहे ही दिवाळी तुम्हां सर्वांनाही अशी असंख्य नाती घेऊन येवो जी तुम्हांला तुमची उत्कटता टिकवून ठेवण्यासाठी मदत करतील आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा उत्सव करतील!
-गोसाव्यांचा योगेश आणि परिवार 🙏🏻
दिवाळी, २७ ऑक्टोबर २०१९
Comments
Post a Comment