मोहिका
गोड अनामिक चाहुलीने गालावर लाली पसरू लागली!
हळदीचा तोरा मिरवून झाला, मेंदीचा रंग रंगात आला!
जवळ येणाऱ्या पावलांचा आवाज अजून गडद होऊ लागला!
पण आत अजून कोठेतरी काय हे टोचतंय?
कोणीतरी मला आत अजून का ओढतंय?
माझंच आहे हे घर, मग आता परकं का भासतंय?
सगळ्या स्वकीयांच्या गराड्यात एकटं का वाटतंय?
हेच असतं का लग्न, सगळं सोडून निघणं?
नव्याने आपलं जग दुसऱ्या सोबत वसवणं?
सगळ्यांची काळजी घेणारी मी, माझी काळजी कोण घेईल?
की तुम्हां सर्वांचे शुभाशीर्वाद मला किनारा दावतील?
नकोत आता कुठल्या व्यर्थ ह्या चिंता,
टाकता पाऊल एक एक सुटेल सगळा गुंता!
दोघे मिळून चढवू संसाराची विट एक एक नवी,
तुमची पावलं वाढवतील त्यात सुखं हवी हवी!
-योगेश गोसावी
२ डिसेंबर, २०१९
Comments
Post a Comment